पुरणाची पोळी (गुळाची)

पुरणाची पोळी (गुळाची)

साहित्य :

चार वाट्या चांगल्यापैकी चण्याची डाळ

चार वाट्या चिरलेला चांगला पिवळा गूळ

चांगल्या गव्हाची कणीक दोन वाट्या

दहा-बारा वेलदोडे

अर्धे जायफळ

अर्धी वाटी तेल

दोन वाट्या तांदळाची पिठी

अर्धा चमचा मीठ

कृती :

जास्त पाण्यात डाळ चांगली शिजवून घ्यावी.

गरम असतानाच चाळणीत ओतून त्याचे सर्व पाणी काढून घ्यावे.

हे पाणी कटाच्या आमटीकरिता उपयोगात आणावे.

डाळ गरम असतानाच त्यात गूळ घालून पुरण शिजवून घ्यावे.

थंड झाल्यावर पुरण वाटावयाच्या यंत्राने अगर पाट्यावर चांगले वाटून घ्यावे.

वाटताना त्यात वेलदोड्यांची पूड व जायफळाची पूड घालावी, याप्रमाणे पुरण तयार करावे.

कणीक प्रथम पिठाच्या चाळणीने चाळून घेऊन, पाण्यात घट्ट भिजवून घ्यावी.

एक तासानंतर पाणी लावून लावून, कुटून अगर मळून नरम करावी.

नंतर मीठ घालून परत चांगली मळावी.

एका भांड्यात तेल घालून, त्यात ती कुटलेली कणीक ठेवून द्यावी.

त्यातील थोडी कणीक घेऊन गोळा करावा व त्याच्या दुप्पट पुरण घेऊन त्याचा गोळा करावा.

कणकेच्या गोळ्यात तो घालून त्याचा उंडा करावा व पिठी घेऊन त्यावर हलक्या हाताने पातळ पोळी लाटावी.

तव्यावर टाकून ही पोळी बदामी रंगावर भाजून काढावी.

४ वाटी डाळीच्या आठ-नऊ इंच व्यासाच्या २० पोळ्या होतात.

टीप :

पोळी तव्यावर असतानाच, ती भाजून झाल्यावर त्यावर चमचाभर तूप सोडून त्यावर दळलेली साखर पसरावी मग पोळी काढावी.

साखर पसरलेली पोळी जास्त खमंग व मिष्ट लागते.

आवडत असल्यास अशी साखर घालावी.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.